महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल २७ मार्च रोजी सात फेरे घेऊन लग्नबेडीत अडकत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तमिळ भाषेतील ग्लेन आणि विनी रमण यांची लग्नपत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. कस्तुरी शंकर यांच्या व्हेरीफाईड ट्विटर अकौंटवर ही पत्रिका शेअर केली गेली आहे. ३३ वर्षीय मॅक्सवेल आणि विनी रमण यांचा साखरपुडा मार्च २०२० मध्ये झाला होता पण कोविड मुळे हे लग्न थांबविले गेले होते.
कस्तुरी शंकर यांनी मॅक्सवेल आणि विनीची लग्नपत्रिका शेअर करताना हा विवाह २७ मार्च रोजी मेलबर्न येथे तमिळ रितीरिवाजानुसार होत असल्याचे म्हटले असून या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएल २०२२ चा १५ वा सिझन २७ मार्च पासूनच सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मॅक्सवेल आयपीएलच्या सुरवातीच्या काही सामन्यात खेळू शकणार नाही असे संकेत दिले जात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मॅक्सवेल ला ११ कोटी रुपयांवर रिटेन केले आहे. उजव्या हाताचा हा फलंदाज सध्या ऑस्ट्रेलियात श्रीलंकेविरोधात पाच टी २० सामन्याची मालिका खेळत आहे.
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांची ओळख २०१३ मध्ये झाली होती. तमिळ कुटुंबातील विनी मेडिकल प्रोफेशनल असून त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहे. एका स्टार इव्हेंट मध्ये ग्लेन आणि विनी भेटले होते तेव्हा मॅक्सवेल प्रथमच भारतीय मुलीकडे आकर्षित झाला होता. २०१७ पासून हे दोघे डेटिंग करत आहेत.