महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघात उद्यापासून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा बीसीसीआयने केली. वन डे मालिकेमध्ये निर्भेळ यश मिळवल्यानंतर टी-20 मालिकाही खिशात घालण्याचा प्रयत्न यजमान टीम इंडियाचा असणार आहे. या मालिकेपासून रोहित शर्मा आपल्या टी-20 कर्णधारपदाचा शुभारंभ करणार असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला धक्का बसला होता. वन डे मालिकेदरम्यान जायबंदी झालेला केएल राहुल संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. राहुल नसल्याने उपकर्णधारपद ऋषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आले आहे. वन डे मालिकेप्रमाणे टी-20 मालिकेतही पाहुण्या संघाचा धुव्वा उडवण्यासाठी रोहितसेना 16 फेब्रुवारीपासून मैदानात उतरेल.
केएल राहुलप्रमाणे अष्टपैलू खेळाडू वाशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल देखील देखील टी-20 मालिकेतून बाहेर झाले आहेत. तिसऱ्या वन डे मध्ये क्षेत्ररक्षण करताना वाशिंग्टन याला दुखापत झाली होती त्यामुळे तो टी-20 मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली. सुंदरच्या जागी कुलदीप यादव याची संघात वर्णी लागली आहे.
पंतची पदोन्नती
ऋषभ पंत याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. मात्र आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सेमीफायनलपर्यंत उडी घेतली होती. हा अनुभव लक्षात घेऊन बीसीसीआयने राहुलच्या अनुपस्थितीमध्ये त्याला पदोन्नती देत उपकर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात घातली आहे.
टी-20 सामन्यांचे वेळापत्रक
पहिला टी-20 – 16 फेब्रुवारी (कोलकाता)
दुसरा टी-20 – 18 फेब्रुवारी (कोलकाता)
तिसरा टी-20 – 20 फेब्रुवारी (कोलकाता)