महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ फेब्रुवारी । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आज मुंबईत महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना भाजपच्या साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं म्हटलं होतं.त्यामुळे आता हे साडेतीन नेते कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर राऊतांच्या भाषणात काही भाजप नेत्यांचे उल्लेख आले. यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Sanjay Raut Press Conference)
1. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेबद्दल माहिती देताना भाजपचे साडेतीन नेते त्यांच्या रडारवर असल्याची माहिती दिली. त्यामुळे आता हे नेते नेमके कोण अशी चर्चा सुरू आहे. या भाषणात राऊतांनी सगळ्यात आधी किरीट सोमय्या यांचा उल्लेख केला. सोमय्यांचे पीएमसी बँक घोटाळ्यात असलेले संबंध त्यांनी अधोरेखित केले. याचे काही पुरावे देखील राऊत यांनी माध्यमांसमोर ठेवले.
2. मुलीच्या लग्नानंतर ईडीची चौकशी मागे लागली, असं राऊत यांनी म्हटलं होते. मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला लागले. हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले. किती पैसे दिले अशी विचारणा केली. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला. त्यात कार्पेट टाकलेलं होतं. या कार्पेटची किंमत साडेनऊ कोटी होती. त्यांनी नाव न घेता मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. सुधीर मुनगंटीवारांकडे त्या वेळी वन खातं होतं. त्यामुळे मुनमंटीवारांचा नामोल्लेख राऊत यांनी केला.
3. सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत असताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ठराविक लोकांना कंत्राटं मिळाली. एस.नरवर या व्यक्तीचा उल्लेख केला. नरवर यांचा दुधाचा व्यवसाय़ आहे. भाजचं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर या व्यक्तीचा राज्यात वावर वाढला आणि पाच वर्षात त्याची संपत्ती 700 कोटींवर गेल्याचा आरोप राऊत यांनी केला.
3.5 याच वेळी बोलताना संजय राऊतांनी मोहीत कंबोजचा उल्लेख केला. कंबोज हा फडणवीसांचा फ्रन्टमॅन आहे, असं त्यांनी म्हटलं. कंबोज हे भाजप नेत्यांचे निकटर्तीय आहेत. त्यांचे भाजपसोबत असणारे संबंध याआधीही समोर आले आहेत. कंबोज यांची वाढलेली मालमत्ता आणि त्यांचे भाजप नेत्यांशी असणारे आर्थिक लागेबांधे यावर राऊत यांनी भाष्य केलं.
राऊत यांना पत्रकार परिषदेनंतर साडेतीन नेत्यांची नावं विचारण्यात आली. मात्र, त्यांनी ही नावं उद्यापासून समोर येणार असल्याचं सांगितलं.