Bappi lahiri passes away : संगीत विश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ फेब्रुवारी । अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु (Mumbai Hospital) असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लाहिरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.

त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते.

बाप्पी लाहिरी यांची गाजलेली बॉलिवूड गाणी
यार बिना चैन कहा रे

याद आ रहा है तेरा प्यार

रात बाकी, बात बाकी

तम्मा तम्मा लोगे

बम्बई से आया मेरा दोस्त

ऊलाला ऊलाला (डर्टी पिक्चर)

तुने मारी एंट्रिया

दोन वर्षांपूर्वी कोरोनावर मात
बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लाहिरी बन्सल असा परिवार आहे. 2020 मध्ये एप्रिल महिन्यात बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना सौम्य लक्षणे होती. ब्रिच कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती.

पश्चिम बंगालमध्ये जन्म
बप्पी लाहिरी यांचे मूळ नाव अलोकेश लाहिरी. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपायगुडीमध्ये झाला होता. त्यांचे आई-वडील अपरेश लाहिरी आणि बन्सुरी लाहिरी हे दोघेही बंगाली गायक, तर शास्त्रीय आणि श्यामा संगीतातील संगीतकार होते.

भाजपच्या तिकीटावर निवडणूक
बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार घोषित करण्यात आले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *