आता Flipkart वरही विकता येणार स्मार्टफोन; ‘असे’ काम करते ‘Sell Back’ ऑप्शन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ फेब्रुवारी । वॉलमार्टची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने (Flipkart) ‘सेल बॅक प्रोग्रॅम’ (Sell Back)ची घोषणा केली आहे. या प्रोग्राममध्ये स्मार्टफोन वापरकर्ते आपला जुना फोन चांगल्या किमतीत फ्लिपकार्टवर विकू शकतात. फ्लिपकार्टने सांगितल्यानुसार, सध्या हा प्रोग्रॅम फक्त स्मार्टफोनसाठीच सुरु करण्यात आला आहे. परंतु लवकरच हा प्रोग्रॅम इतर कॅटेगरीकरिता सुरु करण्यात येईल. या प्रोग्रॅमच्या मदतीने संपूर्ण देशातून ई-वेस्टची समस्या दूर करण्याचा कंपनीचा हेतू आहे. जाणून घेऊया, फ्लिपकार्टच्या या सेल बॅक प्रोग्रॅम अंतर्गत तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन कसा विकू शकता.

फ्लिपकार्टने सध्या सेल बॅक प्रोग्रॅम देशाच्या १७०० पिनकोडवर सुरु केला आहे. यात दिल्ली, कोलकाता आणि पटना यासारख्या शहरांच्या पिनकोडचा समावेश आहे. फ्लिपकार्टने नुकतंच ‘यंत्रा’ (Yaantra) या कंपनीला विकत घेतले आहे. हा सेल बॅक प्रोग्रॅम याचाच एक भाग आहे.

फ्लिपकार्ट देणार ई-व्हाउचर :
सेल बॅक प्रोग्रॅम अंतर्गत आपला जुना फोन विकल्यावर फ्लिपकार्ट आपल्या वापरकऱ्यांना पैशांच्या जागी ई-व्हाउचर देईल. या व्हाउचरचा वापर करून तुम्ही फ्लिपकार्टवर खरेदी करू शकता. तसेच, फ्लिपकार्टने सांगितले, येणाऱ्या दिवसात सेल बॅक प्रोग्रॅममध्ये स्मार्टफोन व्यतिरिक्त दुसऱ्या उत्पादनांचा देखील समावेश केला जाईल. जर तुम्हाला सुद्धा आपला जुना फोन या प्रोग्रॅमअंतर्गत चांगल्या किमतीत विकायचा असेल, तर तुम्हाला खालील पायऱ्यांचा वापर करावा लागेल.

असे काम करते सेल बॅक प्रोग्रॅम :
फ्लिपकार्टच्या सेल बॅक प्रोग्रॅमचा फायदा उचलण्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट अ‍ॅपवर लॉगिन करावे लागेल. यात खाली दिलेल्या सेल बॅक पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यानंतर तीन प्रश्नांचे उत्तर देऊन तुम्ही जुन्या स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊ शकता.

जर तुम्हाला किंमत योग्य वाटत असेल तर तुम्ही याची पुष्टी करा. यानंतर ४८ तासांच्या आत, फ्लिपकार्टचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन फोन जमा करेल.

हँडसेटची पडताळणी केल्यानंतर काही तासांत फ्लिपकार्ट तुम्हाला पुष्टी केलेल्या विक्री मूल्याचे व्हाउचर जारी करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *