बप्पी दा:48 वर्षांच्या करिअरमध्ये 500 चित्रपटांमध्ये 5000 गाणी केली संगीतबद्ध, किशोर कुमार यांच्या निधनानंतर सोडणार होते म्युझिक इंडस्ट्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ फेब्रुवारी । बॉलिवूडचे दिग्गज गायक बप्पी लहिरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. भारतीय चित्रपटांच्या संगीताच्या इतिहासात संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे नाव प्रसिद्ध आहे. बप्पी दा यांनी 48 वर्षांत 500 हून अधिक चित्रपटांमध्ये 5,000 हून अधिक गाणी संगीतबद्ध आणि गायली आहेत. हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, ओरिया, भोजपुरी, आसामी भाषांसोबतच बप्पी लहिरी यांनी बांग्लादेशी चित्रपट आणि इंग्रजी गाणीही रचली. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी…

एकदा बप्पी दा म्हणाले, ‘मी किशोर दा यांना ‘किशोर मामा’ म्हणायचो, त्यांच्यासोबत अनेक चित्रपटात गाणी गायली. पण त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्र सोडून द्यावे असे मला वाटले होते. 1987 मध्ये किशोर दा गेल्यानंतर कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. तेव्हा बाबा मला म्हणाले की, किशोर मामांचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील, काम सोडू नकोस. त्यानंतर 1991 मध्ये शब्बीर कुमार यांनी माझे ‘गोरी है कलाईयां’ हे गाणे गायले आणि ते सुपरहिट झाले. त्यानंतर कुमार सानूने ‘जिंदगी एक जुआ’मध्ये माझ्यासाठी एक गाणे गायले.’

बप्पी दा यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या तिस-या वर्षीच सुरु झाले होते. तिस-या वर्षापासून बप्पी यांनी तबला वाजवणे सुरु केले होते. बप्पी लहिरींचे मूळ नाव आलोकेश होते. त्यांचे वडील अपरेश संगीताचे जाणकार होते. किशोरकुमार हे या कुटुंबाचे दूरचे नातेवाईक आहेत. बप्पी लहिरींनी 19 व्या वर्षी ‘दादू’ या बंगाली चित्रपटापासून आपला संगीतप्रवास सुरू केला. त्याचवर्षी ते मुंबईला आले. त्या काळात त्यांना हिंदीचा गंधही नव्हता. त्यांनी हिंदीशिवाय मल्याळम भाषेतील ‘गुड बॉइज’लाही संगीत दिले. अनेक गाणीही त्यांनी गायली .

1980 आणि 90 च्या दशकात बप्पी दा यांनी जबरदस्त साउंड ट्रॅक्स बनवले. यामध्ये वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो, गँग लीडर, शराबी सारखे चित्रपटांचा समावेश आहे. ते पहिले असे संगीतकार होते ज्यांना 1982 मध्ये आलेल्या ‘डिस्को डान्सर’साठी बीचिंगमध्ये ‘चायना अवॉर्ड’ मिळाला होता.

बप्पी लहरींनी संधी मिळाली तेव्हा शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर गाणीही त्यांनी तयार केली. चित्रपटसृष्टीत त्यांचे व मिथुन चक्रवर्तीचे आगमन सोबतच झाले होते. त्यांची डिस्कोवर आधारित गाणी बरीच लोकप्रिय झाली. बप्पी लहरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय आहेत.

बप्पी दांचे आई-वडील बंगाली सिंगर आणि क्लासिक म्युझिशियन होते. कोलकातामध्ये बप्पी यांचा जन्म झाला होता. बप्पी लहरी हे आपल्या आई-वडिलांना एकुलते एक होते. आईच्या नात्यातून गायक आणि अभिनेते किशोर कुमार त्यांचे नातेवाईक होते. बप्पी दांच्या आईचे नाव चित्रांशा होते. बप्पी यांना दोन मुलं आहेत. मुलगी रीमाही गायिका आहे. तिचे लग्न बिझनेसमन गोविंद बंसलसोबत झाले आहे. तर बप्पी दा यांच्या मुलाचे नाव बाप्पा लहरी असून तो संगीतकार आहे आणि त्याचे लग्न तनिषा वर्मासोबत झाले आहेत. त्याला एक मुलगा असून क्रिश हे त्याचे नाव आहे. बप्पी लहरी यांचा नातू क्रिशचा जन्म 4 ऑक्टोबर 2017 मध्ये झाला होता. नातवाच्या नामकरणावेळी बप्पी लहरी यांना आपल्या नातवाला सोन्याच्या ताटात खीर खाऊ घातली होती आणि डायमंड पेंडंट गिफ्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *