महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ फेब्रुवारी । हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) अर्थात विकास पाठक (Vikas Pathak) याच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन भडकावल्याच्या आरोपाखाली हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी (Dharavi Police) 1 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी हिंदुस्तानी भाऊला जामीन मिळाला. मात्र, हा जामीन मिळताच आता नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) हिंदुस्तानी भाऊ हाजिर हो… आदेश काढले आहेत.
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन (Online examination) घेण्यात याव्यात या मागणीसाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीस विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू केलं होतं. या प्रकरणात धारावी पोलीस ठाण्यात हिंदुस्तानी भाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तशाच प्रकारे नागपूर येथेही विकास पाठक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आता नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊला नोटीस बजावली आहे.
नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ याला नोटीस बजावली असून 22 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना चिथावणी देत आंदोलन घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
विकास पाठक यानेच 30 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगितला. एवढंच नाहीतर वेळ आणि किती वाजेपर्यंत आंदोलन करायचे याची सूचना सुद्धा केली होती.
गृहमंत्र्यांनी दिले होते चौकशीचे आदेश
राज्यातील महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. पण, या निर्णयाच्या विरोधात नागपूर, मुंबई, पुणे आणि बीडमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संशय व्यक्त केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘नोटीस न देता आंदोलन करण योग्य नाही, काही ठिकाणी मुलं आंदोलन करत असली तरी लाखो लोक मेसेज करत आहेत की परीक्षा घ्या, पण चुकीचा पायंडा पाडायचा नाही, कमी गुणांचा पेपर घेतला जाऊ शकतो का हा विचार करू शकतो, पण परीक्षा घेऊ नये असं होणार नाही, असंही गृहमंत्री म्हणाले होते.