महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । आपल्या स्वयंपाकघरातले अनेक पदार्थ हे केवळ अन्नपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर अन्य अनेक गोष्टींसाठीही फायदेशीर असतात. लवंग (Benefits of Cloves) हा पदार्थ यापैकीच एक. मसाल्याचा पदार्थ म्हणून लवंग ओळखली जाते. चवीला तिखट असणाऱ्या लवंगामध्ये औषधी गुणधर्मदेखील असतात. लवंगामुळे अन्नपदार्थांची चव वाढतेच, तसंच ती अनेक आजारांवरही गुणकारी ठरते.
लवंग ही औषधी गुणांनी युक्त असल्याने तिचा रोजच्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे. लवंगामधल्या अँटिऑक्सिडंट (Antioxidant) हा गुणधर्म आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतो. तसंच लवंगामध्ये अँटिसेप्टिक, अँटिव्हायरल आणि अँटिमायक्रोबिएल असे गुणधर्मही असतात. त्यामुळे विविध आजारांवर लवंग गुणकारी ठरते. लवंगमधल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीरातील फ्री-रॅडिकल्समुळे (Free-radicals) होणारं नुकसान टाळता येतं. तसंच यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकल्यासारख्या सर्वसामान्य संसर्गजन्य आजारावरदेखील लवंग गुणकारी ठरते.
लवंग ही आहारात अनेकप्रकारे समाविष्ट करता येते. एखाद्या अन्नपदार्थात लवंग टाकता येते. तसेच लवंगाचा चहा (clove Tea) देखील उत्तम असतो. वारंवार डोकेदुखीचा (Headache) त्रास होत असल्यास त्यावर लवंग खाणं उत्तम उपाय ठरतो. डोकेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही लवंगच्या कळ्यांची पेस्ट तयार करून त्यात थोडं सैंधव मीठ टाकून हे मिश्रण एक कप दूधात मिक्स करून पिऊ शकता. हा डोकेदुखीवर नैसर्गिक उपचार मानला जातो.
लवंग सेवनामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी (White Cells) वाढण्यास मदत होते. आयुर्वेदात लवंगही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे. तेलकट त्वचेवर मुरूम येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. मुरुमांच्या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी लवंग खूप फायदेशीर ठरते. मुरुम सहसा चेहऱ्यावर घाण साचल्याने होतात. मात्र या समस्येवर लवंग वरदान आहे. यातील अँटिबॅक्टेरियल तत्व हे त्वचाविकार (Skin Disease) दूर करण्यास मदत करतात. तसेच लवंगमधले अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म मुरुमांची सूज आणि लालसरपणा हळूहळू कमी करतात.
डायबेटिस (Diabetes) हा एक जटिल आजार मानला जातो. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवून शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. लवंगाचा वापर डायबेटिससारख्या अनेक आजारांमध्ये केला जातो.
आपल्याकडे टूथपेस्टमध्ये लवंगचा सर्वाधिक वापर केला जातो. दातांच्या (Teeth) आरोग्यासाठी स्वच्छ कापडावर लवंगाचं तेल टाकून ते दात आणि हिरड्यांवर लावू शकता. सुरुवातीला यामुळे वेदना कमी होतात आणि त्यानंतर संसर्ग दूर होतो. दातदुखी दूर करण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम उपाय आहे. अशी ही बहुगुणी लवंग अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरता येते.