महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख, पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रविवारी सायंकाळी करवीर नगरीत दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे प्रथमच जिल्हा दौऱयावर आले आहेत. दरम्यान, त्यांनी आज शिरोळ तालुक्यातील प्रसिद्ध नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी पर्यटनाला चालना मिळण्यासाठी कृष्णा-पंचगंगा फाउंडेशनच्या वतीने भाविकांसाठी केलेल्या पर्यटन बसचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारा येथून सायंकाळी नृसिंहवाडी येथे श्री आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच शिवसैनिक तसेच ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त गर्दी लोटली होती. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन मंदिर परिसराची माहिती दिली. आदित्य ठाकरे यांनी पायी चालत येथील भक्तगण, ग्रामस्थ आणि व्यापाऱयांसोबत संवाद साधला. यानंतर श्री दत्त दर्शन घेऊन महाराष्ट्रात सुख शांती लाभू दे अशी प्रार्थना केली. यावेळी दत्त देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान नरसोबाची वाडी देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. pic.twitter.com/5wBQAjXXrJ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 20, 2022
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिरोळ तालुकाप्रमुख वैभव उगळे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल चव्हाण, हर्षल सुर्वे, अमोल विभूते, विकास कदम, युवासेना तालुका युवा अधिकारी प्रतीक धनवडे, अनंत धनवडे, सागर धनवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अपर्णा मोरे, नृहसिंहवाडीच्या सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे, सचिव नारायण पुजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.