सांगली : अमर रहे अमर रहे…साश्रुनयनांनी शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । काश्मीरमध्ये सोपेर चेरामार्ग येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झालेले शिगाव येथील जवान रोमित तानाजी चव्हाण यांचे पार्थिव सोमवारी (दि. 21) पहाटे शिगाव येथे आणण्यात आले. दरम्यान, आज सकाळी शोकाकूल वातावरणात शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर रोमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रविवारी शिगाव येथे गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवत अभिवादन केले.

शनिवारी सकाळी चेरामार्ग येथे दहशतवाद्यांना रोखताना झालेल्या गोळीबारात रोमित हे शहीद झाले. या घटनेचे वृत्त शनिवारी दुपारी गावात समजले. रोमित यांचे वडील वीरपिता तानाजी चव्हाण, वीरमाता तसेच रोमित यांच्या बहीण यांच्या सांत्वनासाठी अनेकांनी धाव घेतली. याच दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारणाकाठी अंत्यसंस्कारासाठी मैदान तयार केले. विशेष चबुतरा उभारला आहे. सोमवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

रविवारी दुपारी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार धनश्री भांबुरे यांनी गावात पाहणी केली. स्थानिक प्रशासनास सूचना दिल्या. दरम्यान, सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकार्‍यांनीही गावात पाहणी केली. सरपंच उत्तम गावडे, उपसरपंच शहाजी कांबळे, पोलिस पाटील नरेंद्र मधाळे, माजी सरपंच उदयसिंह पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अभिजीत पाटील, अजित बारवडे, आजी माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष विजय पाटील, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *