गायीच्या दुध खरेदीचा दर 28 ते 30 रुपयांवर; शेतकर्‍यांना दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । जागतिक बाजारात दूध पावडर आणि बटरच्या भावात वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात दुधाच्या खरेदीसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यातून बहुतांशी खासगी दूध डेअर्‍यांकडून गायीच्या दुधाच्या खरेदी दरात सरासरी तीन ते चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गायी च्या दुधाचा खरेदी दर लिटरला 25 ते 26 रुपयांवरुन वाढून 28 ते 30 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

या बाबत माहिती देताना सोनाई दूध डेअरीचे चेअरमन दशरथ माने म्हणाले की, दुधाचे खरेदी दर सर्वस्वी पावडर आणि बटरच्या दरावर अवलंबून असतात. जागतिक बाजारातील मागणीमुळे दूध पावडरचे भाव प्रति किलोस 220 ते 225 रुपयांवरुन वाढून 260 ते 270 रुपये, तर बटरचे भाव 300 ते 315 रुपयांवरुन वाढून 340 ते 350 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या गायीच्या दुधाची खरेदी 25 रुपयांवरुन वाढून खासगी डेअर्‍यांकडून 28 ते 30 रुपयांवर पोहोचली आहे.

भारतातून सध्या तुर्कस्थान, इजिप्त, बांग्लादेश, दुबई आदी देशांमध्ये दूध पावडर आणि बटरची निर्यात सुरु आहे. मागील तीन महिन्यात देशातून सुमारे पन्नास हजार टनाइतकी दूध पावडर आणि 15 हजार टनाइतकी बटरची निर्यात झालेली आहे. सध्याचे वाढलेले दर तुर्त तरी कायम राहतील, असेही माने यांनी सांगितले.

राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले की, पावडर व बटरच्या दरातील तेजीमुळे मागणी वाढलेली असताना सध्या गायीच्या दुधाचा तुटवडा जाणवत आहे. तसेच आता लॉकडाऊन होणार नसल्यामुळे दुधाच्या उपपदार्थांनाही मागणी वाढली आहे. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून गायीच्या दूध खरेदीचे दर किमान 28 ते 30 रुपयांवर पोहोचले आहेत.

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज दूध) कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर म्हणाले की, पंचवार्षिक निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत दुध खरेदी दरवाढ ही व्यवसायाचा एक भाग असून, दरवाढीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी निवडणूक प्रधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी, दुग्ध उपनिबंधकांना पाठविला आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच खरेदी दरात किती वाढ करण्याचे निश्चित होईल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *