महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून शहरात उन्हाची झळ बसू लागली आहे. कमाल तापमानाचा पारा चार ते पाच अंशांनी वर जाणार असून उष्मा वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत; मात्र त्यापूर्वी पुढील तीन दिवस किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यताही आहे.सध्या मुंबईतील किमान तापमान १८ ते १९ आहे. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश आहे.
आठवडाभरात त्यात वाढ होऊन किमान तापमान २१ ते २२ आणि कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कमाल तापमान ३७ अंशांवर जाण्याची शक्यता असल्याने आठवड्याच्या शेवटी उन्हाळ्याची चाहूल लागेल.सध्या मुंबईत दिवसा गरमी आणि रात्री थंडी अनुभवण्यास मिळत आहे. दुपारनंतर वारे काही प्रमाणात वाहत असले, तरी भरदुपारी कडक उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे.
पुढील काही दिवस गारवा
उत्तर भारतातील तीव्र पश्चिमी विक्षोभामुळे (धुके आणि गारा यांची एकत्रित स्थिती) बुधवारी (ता. २३) मुंबईच्या तापमानात घट होईल. २३ ते २५ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ ते १७ अंश राहील. त्यामुळे पुढील काही दिवस गारव्याचा अनुभव घेता येईल, असा अंदाज ‘मुंबई वेदर’ने वर्तवला आहे.