Russia-Ukraine crisis: युद्ध झाल्यास पेट्रोलच नाही तर अन्नही महागणार! भारतावर आर्थिक सावट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine Tensions) युद्धाची स्थिती कायम आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होईल, असे आता जगातील सर्वच देशांना वाटू लागलं आहे. अमेरिकेबरोबरच (America) युरोपातील अनेक देश युक्रेनच्या पाठीशी उभे आहेत आणि काही देश रशियाच्या पाठीशी उभे आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध झालं तर परिस्थिती भीषण होईल आणि तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत युद्ध होऊ नये, अशी अनेक देशांची इच्छा आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील हा तणाव संपुष्टात यावा, अशी भारताची (India) देखील इच्छा आहे. दोन्ही देशांनी संवादांतून शांततेचा मार्ग शोधला पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे. अशा परिस्थितीत रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर भारतावरदेखील त्याचे परिणाम होतील. या युद्धामुळे भारताचं काय नुकसान होईल, हे समजून घ्या.

आता एका बाजूला रशिया आहे तर दुसरीकडे युक्रेनसोबत अमेरिका आहे. अमेरिका, युरोपातील अनेक देश आणि नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचे (NATO) सदस्य देश रशियाच्या विरोधात आहेत. आपल्या पंचशील तत्त्वांचे पालन करणारा भारत सहसा परस्पर विवादांमध्ये हस्तक्षेप करत नाही. अशा परिस्थितीत अडचण अशीही आहे की, भारताने रशियाला पाठिंबा दिला तर अमेरिका नाराज होईल आणि युक्रेनच्या बाजूने उभ्या असलेल्या अमेरिकेला पाठिंबा दिला तर रशिया नाराज होईल. सध्याची परिस्थिती पाहता भारताला अमेरिका आणि रशिया दोघांशी संबंध चांगले ठेवायचे आहेत. महत्वाचं म्हणजे रशिया हा भारताचा सर्वात मोठा डिफेन्स पार्टनर (defense partner) आहे.

डिफेन्स पार्टनरशिप मिशनअंतर्गत भारत रशियाकडून S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम खरेदी करत आहे. यावर अमेरिका आक्षेप घेणार नाही, अशी अपेक्षा भारताला आहे. अमेरिकेत 2016 साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी रशियावर हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. परिणामी 2017 मध्ये, अमेरिकेने ‘काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स’ कायदा पास केला. त्यानुसार अमेरिका रशियाकडून लष्करी उपकरणं खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादते. 2018 मध्ये झालेल्या डिलनुसार भारत रशियाकडून S-400 खरेदी करणार आहे. अशा स्थितीत युक्रेन आणि रशियामधील वाढलेल्या तणावामुळे अमेरिका भारतावर कठोर निर्बंध लादू शकते.

काळ्या समुद्राच्या प्रदेशातून अन्नधान्याच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास त्याचा इंधन आणि अन्नधान्य महागाईवर (Inflation) मोठा परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांना वाटते. रशिया हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गहू (wheat) निर्यातदार देश आहे, तर युक्रेन हा गव्हाचा चौथा मोठा निर्यातदार आहे. एकूण जागतिक गव्हाच्या निर्यातीपैकी एक चतुर्थांश वाटा या दोन्ही देशांचा आहे. अशा परिस्थितीत युद्ध झाल्यास जगात आणि भारतात गव्हाचे भाव वाढू शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या रिपोर्टनुसार, कोरोना महामारीच्या प्रभावामुळे आधीच अन्नधान्याच्या किमती एका दशकाहून अधिक काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यात या दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते.

जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर रशिया तेल (oil) आणि गॅसचा (gas) पुरवठा बंद करेल आणि किंमती वाढवेल, अशी भीती युरोपीय देशांना आहे. रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एका महिन्यात तेलाच्या किमती 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास तेलाची किंमत प्रति बॅरल 125 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. अशा स्थितीत त्याचा भारतावरही मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

धातूच्या किमती वाढतील

रशियावरील निर्बंधांच्या भीतीने मागच्या काही आठवड्यांमध्ये ऑटोमोटिव्ह एक्झॉस्ट सिस्टम आणि मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या पॅलेडियमची या धातूची किंमत वाढली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा (Palladium ) पॅलेडियम निर्यात करणारा देश आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशभरात पेट्रोल (petrol diesel rates) आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. रशिया-युक्रेन दरम्यानचा तणाव असाच सुरू राहिल्यास भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो आणि तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम चालू खात्यातील तुटीवर होऊ शकतो.

राजकीय नुकसान

आंतरराष्ट्रीय सुरक्षेबद्दल बोलायचं तर भारताला सर्व बाजूंनी शत्रू राष्ट्रांनी घेरलं आहे. एकीकडे पाकिस्तान (Pakistan)तर दुसरीकडे चीन (china) आहे. त्याचबरोबर नेपाळसोबतही काही मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. विशेषत: लडाख आणि काश्मीर हे भारताचे सर्वात संवेदनशील भाग आहेत, जिथे पाकिस्तान-चीनसारख्या देशांचं आव्हान आहे. अशा स्थितीत भारताने अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या युक्रेन किंवा शस्त्र पुरवठा करणाऱ्या रशियापैकी कोणत्याही एकाला नाराज केले तर त्याचा फायदा चीनला राजकीय पातळीवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारत आपल्या पंचशील तत्त्वांना चिकटून राहील अशीच स्थिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *