महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी केंद्रीय तपास पथक पोहोचलं आहे. सीआरपीएफ जवानांसह (CRPF Jawan) पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. ईडीने ही कारवाई केली नसल्याचा दावा केला आहे, त्यामुळे ही इन्कम टॅक्स विभागाची धाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर आता तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना नेते असल्याची चर्चा आहे.
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच दाखल झाले. मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत.
यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचं दिसत आहे.
यशवंत जाधवांच्या घरी ईडीने धाड टाकल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण ही छापेमारी केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही आयकर विभागाची धाड असल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाधवांवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी ईडी- आयकर विभागाला तक्रार केल्यानंतर यशवंत जाधव यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तिला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.