Russia Ukraine crisis :देशात गव्हाचा पुरेशा प्रमाणात साठा: गव्हाची निर्यात वाढवण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine crisis) सातत्याने खटके उडत आहेत. गुरुवारपासून तर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगातील एक प्रमुख गहू निर्यातदार देश (wheat export) म्हणून पुढे येण्याची संधी भारताला निर्माण झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भारताकडे 2.42 कोटी टन गव्हाचा साठा आहे. जो देशातील नागरिकांच्या गरजेपेक्षा दुप्पट आहे. रशिया आणि युक्रेन हे प्रमुख गहू उत्पादक आणि निर्यातदार (export) देश आहेत. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधून जागतिक स्थरावर जवळपास 25.4 टक्के गव्हाची निर्यात केली जाते. मात्र सध्या दोनही देशांवर युद्धाचे ढग दाटले आहेत, त्यामुळे निर्यात ठप्पा होऊ शकते. या संधीचा फायदा भारताला होणार असून, गव्हाची निर्यात वाढू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

इजिप्त सर्वात मोठा आयातदार देश
इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गहू आयातदार देश आहे. इजिप्त दर वर्षी गव्हाच्या आयातीवर चार अब्ज डॉलर पेक्षा अधिक खर्च करतो. इजिप्तला गव्हाचा सर्वाधिक पुरवठा हा युक्रेन आणि रशियामधून होतो. इजिप्तच्या गव्हाची जवळपास 70 टक्के गरज ही या दोन देशांमधून भागवली जाते. दुसरीकडे तुर्की देखील युक्रेन आणि रशियामधूनच गव्हाची आयात करतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी या दोन्ही देशातील गव्हाची जवळपास 74 टक्के गरज ही युक्रेन आणि रशियाने पूर्ण केली होती. या दोन्ही देशांनी मिळून जवळपास 1.6 अब्ज डॉलरचा गहू रशिया आणि युक्रेनमधून खरेदी केला होता. मात्र यंदा युद्ध सुरू झाल्याने निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा फायदा हा भारताला होऊन, गव्हाची निर्यात वाढू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

भारतात गव्हाचे दर वाढणार?
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर होताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सोने देखील महागले आहे. दरम्यान निर्यात वाढल्यास भारतामध्ये गहू आणि मकाच्या दरांमध्ये देखील वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गहू आणि मकाच्या दरांमध्ये जवळपास 30 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गव्हाचे नवीन उत्पादन येईपर्यंत दरात तेजी राहण्याचा अंदाज आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *