महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । एका पाच वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या खाल्ल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्यानेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ही घटना गुरुवारी बिहारच्या खगडिया जिल्ह्यात घडली. या मुलाने घरात असलेल्या लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या चॉकलेट समजून खाल्ल्या. एक दोन नव्हे तर चक्क चार गोळ्या त्याच्या पोटात गेल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला घाम येऊन त्याच्या गुप्तांगाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची प्रकृती अधिक बिघडली.
त्याची अवस्था पाहून कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले. स्थानिक डॉक्टरांनी चौकशी केल्यानंतर त्याच्या कुटुंबाने सत्य परिस्थिती सांगितली. तेव्हा डॉक्टरही बुचकळ्यात पडले. कारण, आजवरच्या हिंदुस्थानी वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात अशा प्रकारची कोणतीही घटना किंवा केस घडलेली नाही. त्यामुळे उपाय काय करावा, हा यक्षप्रश्न डॉक्टरांपुढे उभा राहिला.
स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी पटना येथील एम्स रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधला. हे वैद्यकीय तज्ज्ञ एम्समध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांनाही याचा उपाय माहीत नव्हता. पण, त्यांनी एक अस्सल देशी उपाय सुचवला, जेणेकरून त्याच्या पोटातील औषधाचा अंश कमी करता येईल. त्याला उलटी करवली तर त्याच्या पोटात असलेला औषधाचा अंश निघून जाऊ शकतो, असा सल्ला एम्सच्या डॉक्टरांनी दिला.
त्यानंतर या मुलाला मीठ घातलेलं पाणी पाजण्यात आलं. मुलाने उलटी केल्यानंतर तासाभराने त्याला बरं वाटू लागलं. त्याच्या शरीराला होणारा त्रासही थांबला. त्यानंतरही मुलाला अनेक तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अशा प्रकारच्या गोळ्या लहान मुलांच्या हाताला लागू देऊ नये. जर चुकून गोळ्यांचा अधिक डोस त्यांच्या पोटात गेला तर जिवावर बेतू शकतं, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.