Russia Ukraine War : शरणागतीशिवाय चर्चा नाही, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनचा प्रस्ताव फेटाळला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । रशियाकडून (Russia) यूक्रेनवर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. दुसरीकडे रशियाकडून यूक्रेनवर (Ukraine) मोठा दबाव टाकला जात आहे. यूक्रेनमधील शहरं आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर आणि यूक्रेनच्या तिनही बाजुंनी सैन्य आणि टँक पाठवल्यानंतर आता रशियन सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरापर्यंत पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर यूक्रेनने आपली शस्त्रे टाकल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असं रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी स्पष्ट केलंय. रशियाचे परराष्ट्रमंत्री (Russian Foreign Minister) सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी सांगितलं की मॉस्को (Moscow) यूक्रेनसोबत चर्चेसाठी तेव्हाच तयार होईल, जेव्हा यूक्रेनचं सैन्य आपली शस्त्रास्त्रे टाकेल. त्याचबरोबर यूक्रेनवर नियो-नाझी यांचं राज्य असावं असं मॉस्कोला वाटत नसल्याचंही लावरोव यांनी म्हटलंय.

यूक्रेनवर दुसऱ्या दिवशीही रशियन सैन्यांचे हल्ले सुरु आहेत. राजधानी कीवमध्येही आता बॉम्ब हल्ल्याचे आवाज ऐकायला मिळत आहेत. शुक्रवारी पहाटे कीवमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजताच, शहरातील एका हॉटेलमधील उपस्थित पाहुण्यांना खंदकांमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. कर्मचारी, तसंच स्थानिक विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना चहा आणि खाण्याचे पदार्थ देऊ केले.

यूक्रेनच्या राष्ट्रपतींचं मदतीसाठी आवाहन
दरम्यान, पश्चिमी नेत्यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी त्यांचं लोकशाही पद्धतीने आलेलं सरकार पाडू शकेल, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवू शकेल असे रशियाचे हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केलं आहे.

यूक्रेनचं रशियाला चर्चेसाठी आवाहन
यूक्रेननं एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यूक्रेन रशियासोबत चर्चा करण्यास तयार आहे असं यूक्रेननं जाहीर केलंय. दरम्यान, राष्ट्रपती वोल्दिमीर जेलेंस्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनी सांगितलं की, कीवच्या तटस्थतेबद्दल युक्रेन रशियाशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र सुरक्षेची हमी मिळायला हवी. रशियाचे सैन्य यूक्रेनच्या प्रमुख शहरांवर सातत्याने हल्ला चढवत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीचं वातावरण आहे. रशियन सैन्यानं चर्नोबेल परिसरावर आपला ताबा मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *