महाराष्ट्र २४- ऑनलाईन :बारामती : शहरातील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी (ता.२९) स्पष्ट झाले. ससून रुग्णालय आणि बी.जे. मेडीकल कॉलेजने संबंधित रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल दिल्यानंतर आता प्रशासनाने उपाययोजनांना युध्दपातळीवर प्रारंभ केला आहे. शहरातील एका रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज त्याच्या वैद्यकीय अहवालावरुन स्पष्ट झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. दरम्यान बारामती नगरपालिका व आरोग्य विभागाने संबंधित रुग्णाच्या घराच्या आसपासचा जवळपास तीन कि.मी. चा परिसर सील केला आहे.
या परिसरातील प्रत्येक कुटुंबाचे वैद्यकीय सर्वेक्षण केले जाणार असून या परिसरात पुन्हा नव्याने निर्जतुंकीकरण केले जाणार आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात अनेक जण आले असून त्यांचीही वैद्यकीय तपासणी करुन त्यांनाही चौदा दिवस होम कोरोंटाईन केले जाणार आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी बनविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
श्रीराम नगर हे केंद्र धरुन 3 किमी परिसरात कंटेनमेंट झोन म्हणुन व तेच केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करण्यात आला आहे. सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा यांना यातुन वगळले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडू नये. कंटेनमेंट झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली असून तेथुन सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येतील.
बारामतीकरांना घराबाहेर पडू नका
कोरोनाचा पहिला रुग्ण बारामतीत आढळला असल्याने बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये, स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, गर्दी टाळून पोलिसांना सहकार्य करावे. शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असून त्याला बारामतीकरांनी साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.