दोन दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू, कारवाईत काय हाती लागलं हे मात्र गुलदस्त्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २७ फेब्रुवारी । शिवसेना (shivsena) नेते व मुंबई (mumbai) मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरी दोन दिवसांपासून छापेमारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ही छापेमारी अद्याप सुरू असल्याने अनेकांच्या भुवय्या नक्कीचं उंचावल्या असणार कारण तिथं काय सापडलं हे अद्याप आयकर विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. काही अधिकारी तिथून निघून गेले आहेत. तर काही अधिकारी अजून त्यांच्या घरीचं असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिथले स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे तिथला पोलिस बंदोबस्त अजून वाढवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला तिथं अजून शिवसैनिक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तिथल्या अनेक शिवसैनिकांची समजूत देखील काढली आहे.

यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचार करून कमावलेला सगळा पैसा त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने दुबईत ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आयकर विभागाने छापे मारी करायला सुरूवात केली आहे. दोन दिवसांपासून आयकर विभाग घरात नेमकं काय करतंय हे अद्याप कोणालाही समजू शकलेलं नाही. तसेच त्यांनी आत्तापर्यंत कोणतीही माहिती सांगितलेली नाही. माझगाव येथील यशवंत जाधव यांच्या घरी दोन दिवसांपासून काही अधिकारी तपास करीत आहेत. तर काही अधिकारी तिथून निघून गेल्याचे समजते आहे. त्यामुळे नेमकं काय सापडलं हे मात्र गुलदस्त्यात आहे.

नवाब मलिक यांना अटक केल्यापासून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण महाविकास आघाडीने केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीने राष्ट्रीय यंत्रणांचा वापर करीत असल्याचा आरोप केला आहे. तर नवाब मलिकांनी गुन्हा केल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. कालपासून आझाद मैदानावर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी समोर मोठा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. उपोषणाला महाराष्ट्रातील अनेकांनी समर्थन दर्शविलं आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक मराठी बांधव उपोषणाला समर्थन दर्शविण्यासाठी आझाद मैदान परिसरात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *