![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे. मागील तीन दिवसापूर्वी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेला जोरदार पाऊस आणि गारपीटीमुळे पुन्हा गारठा वाढला आहे. दरम्यान, आज सकाळी दिल्लीत हलका पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यापासून हलक्या पावसाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जोरदार वारे वाहत असल्याने हवेत गारवा आहे. दरम्यान, महाराष्ट्रात तापमानात चढ उतार सुरुच आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे पोहोचला आहे.
आज सकाळी दिल्लीच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली. आर्द्रतेचे प्रमाण 40 ते 93 टक्के होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील हवामान बदलाचे कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे. त्याच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या मध्यवर्ती भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यांव्यतिरिक्त आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.