महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवप्रेमी संघटना व काही राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. उदयनराजे भोसले यांनी त्यावर भूमिका मांडली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच वेगवेगळ्या धर्मातील संतांचा आदर राखला. शिवाजी महाराज स्वत:च्या कर्तबगारीवर आणि मावळ्यांनी दिलेल्या साथीमुळं ते मोठे झाले. अमूक एक व्यक्ती नसता तर शिवाजी महाराज अस्तित्वात नसते असं जे काही राज्यपालांना म्हणायचं होतं ते चुकीचं आहे. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनं थोडासा इतिहास वाचायला हवा होता. इतिहास वाचून त्यांनी वक्तव्य केलं असतं तर ते अधिक योग्य ठरलं असतं. एखाद्याचा हात पकडू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. बोलणाऱ्यानंच शब्द समजून-उमजून वापरायला हवेत,’ अशा शब्दांत उदयनराजे यांनी नाराजी व्यक्त केली.