![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी ।
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही-छत्रपती संभाजीराजे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यांसह समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आमरण उपोषणाला बसले आहेत. दोन दिवसांपासून आझाद मैदानावर त्यांच्या उपोषणाल सुरूवात झाली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आजाद मैदान येथे जाऊन खासदार छत्रपतची संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजेंनी केला आहे. महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, संभाजीराजेंच्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी छावा स्वराज्य सेनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष राम घायतिडक पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष अतुल चव्हाण, ओमकार पाटील, उमेश चंदने, हेमंत शिगवण, मयूर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान येथे जाऊन छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र युवराज छत्रपती शहाजीराजे यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.
15 फेब्रुवारीला संभाजीरजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीदेखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील विविध संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांसह नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे.
हा आमच्या आयुष्यातील काळा दिवस-राम घायतिडक पाटील
दरम्यान, काल दिवसभरात अनेक सामाजिक संघटनांनी उपोषणस्थळी हजेरी लावली, तसेच संभाजीराजे यांची भेट घेतली. भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज तुळजापूर येथे लक्षणिक उपोषण करणार आहेत. तसेच काल छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावत संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला. छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. आज या राजघराण्याला मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावे लागतेय. संभाजीराजेंना उपोषण करावे लागले हा आमच्या आयुष्यातील काळा दिवस आहे असे राम घायतिडक पाटील यांनी म्हटले आहे.