महाराष्ट्र २४- ऑनलाईन :नवी दिल्ली : केंद्र सरकारने महिलांना समाजात सक्षम करण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच ‘सुकन्या समृद्धी योजना’ अशा दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या असून यातील सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १० वर्षांपर्यंतच्या मुलीचे बँक खाते उघडल्यास त्या खात्यातील जमा रकमेवर ९.१० टक्के इतके करमुक्त व्याज मिळणार आहे.
या दोन्ही योजना गर्भातच मुलींची हत्या करण्याच्या प्रथेला आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या सिद्ध होणार आहेत. देशातील मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठीही या योजनांचा मोठा लाभ होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्त्रीभ्रूण हत्या करणारे लोक मनोरुग्ण असतात, असे ठाम मत आहे. लिंगभेद हा समाजाला जडलेला गंभीर आजार आहे. यामुळेच देशात महिलांचा जन्मदर घटत आहे, असेही पंतप्रधानांनी या दोन्ही योजना सुरू करताना म्हटले आहे. मुलगी जन्माला आल्यास तिला मारले जाते तिथेच दुसरीकडे लोक आपल्या मुलाच्या लग्नाकरिता उच्चशिक्षित मुलीचाही शोध घेत असतात, ही मानसिकता योग्य नाही. आपल्या समाजात आजही मुलगा- मुलगी यांच्यात भेद होत असेल तर स्वत:ला २१ व्या शतकातील नागरिक म्हणण्याचा आपल्याला अधिकारच नाही. आपण अजूनही १८ व्या शतकातच जगतो, असेच म्हणावे लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी हरियाणात या योजनांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित समारंभात स्पष्ट केले.