घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही; इंडियन ऑईलनं केली भीती दूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन :नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर अनेक लोकांनी सिलिंडरसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर काही ठिकाणी सिलिंडरसाठी लोकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान, ग्राहकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करू नये. आपल्याकडे सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असं इंडियन ऑईलकडून सांगण्यात आलं आहे.

देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे, अशी माहिती इंडियन ऑईलचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी दिली. सध्या देशातील सर्व प्रकल्प आणि सप्लाय लोकेशन सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही भीती बाळगून घाईत सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. आम्ही एप्रिल महिन्यात आणि त्यानंतर लागणाऱ्या महिन्यांतील इंधनाबाबत माहिती घेतली आहे. त्या दृष्टीनं आमचे प्रकल्प काम करत आहे. याव्यतिरिक्त बल्क स्टोरेज पॉईंट्स, एलपीजी डिस्ट्रिब्यूशनशिप आणि पेट्रोल पंप योग्यरित्या काम करत असल्याचंही ते म्हणाले. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

देशात सध्या लॉकडाउनमुळे रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे मार्च महिन्यात पेट्रोलच्या मागणीत आठ टक्क्यांची घट झाली आहे. तर डिझेलच्या मागणीतही १६ टक्क्यांची घट झाली आहे. याव्यतिरिक्त एटीएफची मागणीही २० टक्क्यांनी घसरल्याचं सिंग यांनी नमूद केलं.

एलपीजीच्या मागणीत वाढ
या महिन्यात एलपीजीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आम्ही सर्व ग्राहकांपर्यंत योग्यरित्या ही सेवा पोहोचवत आहोत. लॉकडाउन नंतर एलपीजीच्या मागणीत २०० टक्क्यांची वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं. कोणत्याही प्रकारची भीती मनात बाळगून सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. ग्राहकांची पूर्ण करण्यासाठी योग्य प्रमाणात साठा उपलब्ध असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *