IND vs SL, Test Series : ट्वेंटी-२०नंतर टीम इंडिया कसोटीत श्रीलंकेला लोळवणार; असा असेल भारतीय संघ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत विजयाचा सपाटा लावला आहे. आता त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत ज्या प्रकारे भारतीय संघात बदल पाहायला मिळाले, तसेच बदल कसोटी संघातही दिसणार आहेत. संघातील दोन अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना ( Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara) यांना खराब फॉर्मामुळे बाकावर बसवण्यात आले. त्यांच्या गैरहजेरीत भारतीय संघ कदाचित प्रथमच कसोटी सामन्यात उतरणार आहे.

भारत-श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी सामना ४ मार्चपासून मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा हा १०० वा कसोटी सामना आहे. त्यामुळे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार विराटला विजयी भेट देण्यासाठी सहकारी उत्सुक आहेत. या कसोटीत नवीन चेहरे दिसणार आहेत. ट्वेंटी-२० मालिकेत विश्रांती घेतलेले विराट व रिषभ पंत हे दोघंही कसोटी मालिकेसाठी संघात परतले आहेत आणि त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा सलामीची जबाबदारी सांभाळतील, तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळेल. पुजारा व रहाणे यांच्या जागी कोण, या प्रश्नाचे उत्तर संघ व्यवस्थापनाने शोधले आहे. शुबमन गिल ( तिसऱ्या), रिषभ पंत ( पाचव्या) आणि हनुमा विहारी ( सहाव्या) क्रमांकावर खेळणार असल्याचे वृत्त PTI ने दिले आहे.

या मालिकेनंतर भारतीय संघ थेट जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर स्थगित केलेली एकमेव कसोटी खेळणार आहे आणि त्यातही रहाणे व पुजारा संघाचा भाग नसतील असे PTIने सांगितले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजा, आर अश्विन/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज/उमेश यादव अशी प्लेईंन इलेव्हन असू शकते.

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)

श्रीलंकेचा कसोटी संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथुम निसंका, लाहिरू थिरिमने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चारिथ असलंका, निरोशन डिक्वेल्ला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रमे, लसिथ एम्बुल्डेनिया, कुशल मेंडिस (फिटनेस पाहून निर्णय घेणार)

कसोटीचे वेळापत्रक
पहिली कसोटी – ४ ते ८ मार्च, मोहाली
दुसरी कसोटी – १२ ते १६ मार्च ( डे नाईट), बंगळुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *