महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या रशिया-युक्रेनमधील चर्चा निष्फळ ठरली असून युद्धाचा भडका कायम आहे. रशियन फौजांनी आधी परत जावे, अशी ठाम भूमिका युक्रेनने घेतली, तर युक्रेनियन सैन्याने शस्त्रे खाली ठेवावीत, अशी अट रशियाने ठेवली. त्यामुळे बेलारूसच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात साडेतीन तास सुरू असलेल्या चर्चेतून तोडगा निघालेला नाही असे वृत्त आहे. दरम्यान, रशियाने राजधानी कीव्हसह अनेक ठिकाणी हल्ले वाढविले असून अणुयुद्धाचा धोका कायम आहे. तर दुसरीकडे युक्रेनला युरोपियन देशांकडून शस्त्रास्त्रे मिळणार आहेत.
युद्धाच्या पाचव्या दिवशी रशिया आणि युक्रेनने चर्चेची तयारी दर्शविली. बेलारूस सीमेवर एका अज्ञातस्थळी दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात साडेतीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. या शिष्टमंडळात वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि नेते होते.
चर्चेपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यापुढे दोन अटी टाकल्या होत्या.
युद्ध थांबवायचे असेल तर रशियन फौजांनी युक्रेनमधून परत फिरावे आणि शस्त्रसंधी करावी, युक्रेनला युरोपियन युनियनमध्ये सामील करावे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले.
चर्चेदरम्यान युक्रेन शिष्टमंडळ यावर ठाम राहिले. रशियानेही आधी युक्रेन सैन्याने शस्त्र खाली ठेवावे, शरण यावे अशी अट टाकली. अखेर ही पहिली चर्चा निष्फळ झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये पुन्हा लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.