Railway Reservation: एक्स्प्रेस गाड्यांमधील आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय ; बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । आगामी उन्हाळी सुट्टी आणि नियंत्रणात आलेला करोना काळ यांमुळे रेल्वे मंडळाने करोना पूर्व रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने आणखी एक निर्णय घेतला आहे. मेल एक्स्प्रेसमध्ये विना आरक्षित डबे सुरू करावे. तसेच रेल्वे गाड्यामध्ये (Express trains) चालू तिकीट देखील प्रवाशांना देण्यात यावे, अशा सूचना रेल्वे मंडळाने केल्या आहेत. एसटी संपाने पिचलेल्या नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या बाबतचे लेखी आदेश सोमवारी रेल्वे मंडळाने सर्व क्षेत्रीय रेल्वेला दिले आहेत.

तर दुसरीकडे राज्यातील करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावरील निर्बंध उठवण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारकडून अभिप्राय मागवला आहे. हा अभिप्राय आल्यानंतर रेल्वे प्रवासावरील निर्बंध पूर्णपणे उठवले जाऊ शकतात. करोना निर्बंधांबाबत सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार आहे, याची माहिती राज्य सरकारने वकिलांमार्फत हायकोर्टाला दिली आहे. राज्य कार्यकारी समितीची बैठक होऊन निर्णय झाला आहे, परंतु त्यावर मुख्य सचिवांची स्वाक्षरी बाकी आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकिलांनी मुंबई हायकोर्टाला दिली.

राज्य सरकारने लोकल प्रवासासाठी करोनाची लस घेणं सक्तीचं केल्यानंतर हायकोर्टाने या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र बरेच दिवस लोटल्यानंतर सरकारने भूमिका न घेतल्याने कोर्टाकडून आता कडक शब्दांत सरकारला सूचना दिल्या जात आहेत. ‘तुमचे मुख्य सचिव आज निवृत्त होत आहेत, मग त्यांची सही झाली नाही म्हणून नंतर आणखी अवधी मागू नका,’ अशा शब्दांत हायकोर्टाने सुनावलं. त्यानंतर मुख्य सचिव आजच सही करतील, असं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *