घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी; वाहतुकीत असा करण्यात आला बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांनी भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना गाभाऱ्यात परवानगी असणार आहे.

देशातील १२ ज्योतिर्लिंगपैकी घृष्णेश्वर हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे घृष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांची बाराही महिने वर्दळ असते. मात्र महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोत असते. रात्री १२ वाजेपासून भक्त दर्शनासाठी रांगा लावून उभे असतात. यावर्षीही असेच चित्र पाहायला मिळाले.’ओम नमः शिवाय, हर हर महादेव’चा नाद मंगळवारी पहाटेपासूनच घुमला. तर महाआरतीच्या वेळी दर्शनासाठी अलोट गर्दी जमली होती.

नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एक डीवायएसपी, एक पोलिस निरीक्षक, दहा सहायक पोलिस निरीक्षक, सहा अधिकारी, एकावन्न होमगार्ड, एक दंगाकाबू पथक, एक बॉम्बशोधक व नाशक पथक असे तौनात करण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टच्या बत्तीस सीसीटीव्हींची करडी नजर राहणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लाखोंची गर्दी पाहता पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद कडून कन्नड-धुळेकडे जाणारी सर्व जड वाहने दौलताबाद टी पॉइंट-आनंद धाबा, कसाबखेडा मार्गे वेरुळ-कन्नडकडे जातील. तर कन्नडकडून येणारी सर्व जड वाहने वेरुळ- कसाबखेडा फाटा शरणापूर फाटा मार्गे औरंगाबादकडे येतील. फुलंबी मार्गे खुलताबादकडे येणारी सर्व वाहने औरंगाबाद मार्गे जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *