महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । रेडिओ चॅनलवर कार्यक्रम घेताना कोणत्याही प्रकारचे अश्लील शब्द टाळावेत, अशा सूचना केंद्र सरकारने रेडिओ जॉकींना केली आहे. या संबंधी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक सूचनावली जाहीर केली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, एफएम रेडिओ चॅनलवर अनेकदा अश्लील किंवा आक्षेपार्ह आशय प्रसारित केला जातो. अनेक रेडिओ जॉकींची भाषा अशोभनीय, द्वयर्थी आणि आक्षेपार्ह असते. ते अनेकदा अपमानजनक टीकाही करतात, असं निरीक्षण मंत्रालयाने केलं आहे. हे वर्तन अयोग्य आहे.
त्यामुळे ग्रँट ऑफ परमिशन अॅग्रीमेंटच्या कलम 7.6 अन्वये अशी ग्रँट मिळणाऱ्या रेडिओ चॅनलने आपल्या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या आशयाबद्दल जागरूक राहणं अपेक्षित आहे. त्यांच्या वाहिनीवर कोणतंही साहित्य, संदेश, जाहीरात किंवा संवाद हे देशाच्या कायद्याच्या चौकटीत असलेले असावेत. असे आशय आक्षेपार्ह, अश्लील, अनधिकृत किंवा असंबद्ध असू नयेत.
त्यामुळे कोणतेही कार्यक्रम ठरवताना योग्य तो आशय प्रसारित करावा. जर अशा प्रकारचे आक्षेपार्ह आशय एखाद्या रेडिओ वाहिनीवर प्रसारित होताना आढळले तर ते या अॅग्रीमेंटचं उल्लंघन मानण्यात येईल आणि संबंधित वाहिनीवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना मंत्रालयाने जारी केल्या आहेत.