महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । रशिया-युक्रेन युद्धामुळे संकटात सापडलेल्या सुमारे १६ हजार भारतीय मेडिकल विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी तेथून परतलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांना भारतातील कॉलेजमध्ये प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकार फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसेन्शिएट रेग्युलेशन (एफएमजीएल) अॅक्टमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, आरोग्य मंत्रालयातर्फे नॅशनल मेडिकल कमिशनला (एनएमसी) पत्र लिहिले जात आहे. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी एफएमजीएल रेग्युलेशन अॅक्ट-२०२१ मध्ये बदल केला जावा, असे त्यात सांगितले जाईल.
सध्या तरी विदेशी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्सच्या पूर्ण अवधी व्यतिरिक्त प्रशिक्षण आणि इंटर्नशिप भारताबाहेरच करावी लागते. युक्रेनमध्ये एमबीबीएस ६ वर्षांचे असते. नंतर २ वर्षे इंटर्नशिप असते. त्यामुळे शिक्षणात बाधा आल्यास हजारो मुलांचे भविष्य संकटात सापडेल.