भाजप आमदारांचा संकुचितपणा; स्वत:चा पगार पक्षाच्याच कोषात जमा’; सामनातून समाचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन :मुंबई: लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना काठीने फटकावणाऱ्या पोलिसांवर आक्षेप घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेकडून फटकारण्यात आले आहे. ही वेळ वादविवादाची नाही. टीका, आरोप करण्याची नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची आहे, असे शिवसेनेने फडणवीसांना सुनावले आहे.

तसेच संकटाच्या काळातही भाजपकडून संकुचितपणा दाखवला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी टाटा, बजाज, अझीम प्रेमजी, अंबानी अशा उद्योगपतींनी योगदान दिले. पण राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपच्या आमदारांनी आपला सरकारी पगार पक्षाच्या सहायता निधी कोषात जमा केला. त्यांना मुख्यमंत्री व त्यांचा मदतनिधी आपला वाटत नाही. संकटातही हे लोक एकत्र येण्यास तयार नाहीत. अशा संकुचित विचारांचे लोक सत्तेवर नाहीत, याचा अभिमान महाराष्ट्राला असल्याचे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.
तसेच शिवसेनेकडून पोलिसांच्या कृतीचेही समर्थन करण्यात आले आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर `दंडुका’ हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे. पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा, असे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे चांगले लक्षण नाही. तरीही लोकांना या महामारीचे गांभीर्य वाटत नाही. कोरोनाची समस्या अशी आहे की, ती दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करून उपयोग नाही. मंदिर, मशीद, शाहीन बाग असे पत्ते पिसून कोरोनावर मात करणे शक्य नाही, असा टोलाही शिवसेनेने या अग्रलेखातून भाजपला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *