महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । देशात सर्वात स्वस्त असणारे पाम तेल हे रशिया- युक्रेन युद्धामुळे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात प्रमुख चार खाद्यतेलांत सर्वात महाग झाले आहे. भारतासाठीच्या शिपिंग किमतीचा विचार केल्यास कच्च्या पाम तेलाची (सीपीओ) किंमत १९१० डॉलर तर कच्च्या सोया तेलाची किंमत १८५५ डाॅलर प्रतिटन झाली आहे. दीड महिन्यांनंतर याची झळ स्थानिक बाजारांत प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे.
युद्धामुळे भारतात येणारा सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबल्याने खरेदीदार पामतेल आणि सोयाबीन तेलाकडे वळत असल्याने त्यांच्या दरात मोठी वाढ होत आहे. मालवाहू जहाजांची वाहतूक बंद झाल्यामुळे भारतीय आयातदार सूर्यफूल तेल पाठविण्यास सक्षम नसून मार्चमध्ये ज्या पाम तेलाचे सर्वात महागडे दर दिसत अाहे, त्याचे भारतीय बाजारात दीड ते दाेन महिन्यांनी चढे दर दिसून येतील. पूर्व युरोपमधील काळ्या समुद्राचा प्रदेश सूर्यफूल तेलाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु, युद्धामुळे भारताचा सूर्यफूल तेलाचा पुरवठा घटला आहे. या युद्धाचा फायदा घेत मलेशिया आणि इंडोनेशियाच्या तेल कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर महाग केले आहेत.आशियाई आणि आफ्रिकन देशांत महागाईने त्रस्त ग्राहकांच्या खिशावर पाम तेलाच्या किमतीत झालेल्या या वाढीचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांना त्यांचा वापर कमी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. स्थानिक बाजारात रविवारी (दि.६) तेलाचे दर दाेन-तीन रुपयांनी कमी झाले अशी माहिती या क्षेत्रातील व्यावसायिक परेश बाेघाणींनी दिली. दीड महिन्यांत पामतेल सर्वात महाग होईल.
महिनाभर पुरले खाद्यतेल
भारताकडे महिनाभर पुरेल इतके खाद्यतेल आहे. त्यासाठी केंद्राने पाम तेलाच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीकडे चर्चा करून तेलाची उपलब्धता वाढवण्यासाठी आयात वाढविली पाहिजे.
-शंकर ठक्कर, राष्ट्रीय अध्यक्ष
१७० रुपये लिटर सोयाबीन
१७० रुपये किलो सूर्यफूल
१५० रुपये लि. पाम तेल