महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मार्च । पुन्हा एकदा अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे वादात अडकण्याची शक्यता आहे. आपल्या किर्तनातून पुन्हा एकदा निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इंदुरीकर महाराजांनी यावेळेस युट्यूबर्सवर टीका केली आहे. पण ही टीका करताना त्यांचा तोल ढळल्याचे दिसून आले आहे.
सोमवारी अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. इंदुरीकर महाराजांनी यावेळी युट्यूबर्सवर सडकून टीका केली. या किर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाल्याचा टोला लगावला. चार हजार युट्यूबवाले कोट्याधीश झाले. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच न्यायालयात खेचले. यांचे वाटोळच होणार. यांचे चांगले होणार नाही, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असेही वक्तव्य केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या किर्तनादरम्यान त्यांचे व्हिडीओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकले. त्यांनी अनेकदा व्हिडीओ काढू नका असे सांगितले. संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला.