![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. बुधवार (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)
पुणे शहर आणि परिसरात ही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या शहर व परिसरात ढगाळ वातावरणाचे सावट कायम असून किमान तापमानात झपाट्याने वाढ तर कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. मंगळवारी शहरात १८.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तर ३४.३ कमाल तापमानाची नोंद झाली.
शहरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसभर ऊन सावलीचा खेळ कायम आहे. तर हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनूसार पुढील चार दिवस शहर आणि परिसरात ही स्थिती अशीच कायम राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अंशतः ढगाळ वातावरण आणि त्यामुळे किमान तापमानात होणारी वाढ यामुळे पुणेकरांना उकाडा देखील अधिक जाणवणार आहे. किमान तापमान हे २० ते २४ अंशांवर पोहचू शकते.