उन्हाळ कांद्याकडून उत्पादकांना मोठ्या अपेक्षा ; कांदा दरांत घसरण होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । कसमादे’ पट्ट्यात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. साधारणपणे पुढील महिन्यापासून बाजारात २० ते २५ टक्क्यांहून अधिक कांदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढून दर गडगडण्याची शक्यता आहे. म्हणून केंद्र सरकारने निर्यात वाढवावी, तसेच निर्यातीसाठी आणखी रेल्वेवॅगन उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.

कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव पट्ट्यात यंदा उन्हाळी कांदा लागवड अत्यंत मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात महाग कांदा उळे खरेदी करून कांदा पिकविला आहे. यामुळे उन्हाळ कांद्याकडून उत्पादकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

अत्यंत उच्च प्रतिचा व रंगाने लालभडक असलेला का कांदा डोळ्यांचे पारणे पेडत असतांनाच रशिया-युक्रेन युद्धाचा भडका उडाला आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होणार या भीतीने उत्पादकांच्या पोटात गोळा आला आहे. साधारणपणे मार्चपासून उन्हाळ कांदा बाजाराज येण्यास सुरुवात होते. मात्र यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने उत्पादकांमध्येही स्पर्धा निर्माण झाली आहे. बाजार समित्यांमध्ये येत्या काही दिवसात आवक वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच पुरवठा वाढताच दरांत मोठी घट होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नाफेडकडे लागले लक्ष

कांदा उत्पादक हा सतत विविध संकंटांचा सामना करीत असतो. कधी अवकाळी, तर कधी सरकारच्या विविध प्रतिकूल धोरणांमुळे त्यांचे नुकसान होत असते. यंदा सुदैवाने उन्हाळ कांद्याचा उत्पादन चांगले होईल, अशी आशा या उत्पादकांना लागली आहे. त्यामुळे सरकारने ‘नापेड’च्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होऊ शकते. यासाठी कांदा उत्पादकांचे लक्ष आता नाफेडकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *