महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्टिंग ऑपरेशनचं पेन ड्राईव्ह (sting operation pen drive) सादर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. पण, कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये फेरफार होऊ शकतो, त्याचा योग्य तपास होऊ द्या, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली.
शिर्डीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी एसटी संप आणि राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर आंबेडकर यांनी शंका उपस्थितीत केली आहे.
‘कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाईसमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत याचा फॉरेन्सिक विभागाकडून योग्य तपास होत नाही, ते फुटेज नीट तपासले जात नाही. त्याचा योग्य तो अहवाल येत नाही तोपर्यंत कुणीही यावर प्रतिक्रिया देणे हे राजशिष्टाचाराला धरून नाही’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तसंच, एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी पहिला राजकीय पक्ष आहे. अडचणीत येऊ नये एवढे आंदोलन न खेचण्याचा सल्ला आम्ही कर्मचाऱ्यांना दिला होता. पण उपटसुंभे कामगार नेत्यांच्या पाठीमागे लागल्याने आज एसटी कामगारांची फसगत झाली, असंही आंबेडकर म्हणाले.
‘एसटी महामंडळाचा निरोप दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे यांनी केवळ नावाला मुख्यमंत्री कर्तृत्वाने नाही. एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावाच लागेल. हे चोर आणि लुटारुंचे सरकार. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू आहे, अशी टीकाही आंबेडकरांनी सरकारवर केली.
‘जेवढे दिवस कामावर गेला नाही त्याची नुकसान भरपाई घेतली जात आहे. पगार कपातीमुळे कामावर जावे का? असा कामगारांपुढे प्रश्न आहे. सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचे आहे. सत्ताधाऱ्यांना स्वतःच्या खाजगी बसेस चालवायच्या आहेत.एसटी महामंडळ मोडण्यासाठी संप हे त्यांना साधन मिळाले आहे. यासाठीच सत्ताधारी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि सत्तेतील राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मुस्लिम आरक्षणाचा विषय आम्ही लावून धारतोय. मुस्लिम आरक्षण लागू करावे असे कोर्टाने मान्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने देखील मुस्लिमांचे शिक्षणातील पाच टक्के आरक्षण रद्द केलेले नाही. त्यामुळे मराठा, ओबीसी आरक्षणाप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचे होणार नाही, असंही आंबेडकर म्हणाले.