महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । रशिया-युक्रेन युद्धाच्या १४ व्या दिवशी विध्वंस थांबण्याची चिन्हे आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी नाटोचे सदस्यत्व घेणार नाही, असे जाहीर केल्यानंतर रशियानेही एक पाऊल मागे येण्याचे संकेत दिल्याने भारतासह जागतिक शेअर बाजारांत निर्देशांक उसळले. तर, दुसरीकडे क्रूड तेलाचे दरही कमी होऊ लागले. यामुळे जगभरातील बाजारांत सकारात्मक संकेत आहेत. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स १२२३.२४ अंकांसह २.२९ टक्के वाढला. दुसरीकडे, निफ्टी निर्देशांक ३३१.९० अंकांनी उसळला.
झेलेन्स्की म्हणाले, दोनेत्सक, लुहान्स्क प्रांतांची स्थिती आणि क्रिमियाला रशियाचे क्षेत्र म्हणून मान्यता देण्याच्या अटींवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. तिकडे रशियन सरकारच्या प्रवक्त्यांनीही चर्चेत प्रगती होत असल्याचे सांगितले. आमच्या अटी मान्य केल्यास युक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई थांबवण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगून रशियानेही शुभसंकेत दिले. युक्रेननेही लष्करी कारवाई थांबवावी, संविधानात बदल करून तटस्थ भूमिका घ्यावी, असे रशियाला वाटते. तसेच क्रीमियाला रशियन क्षेत्र आणि दोनेत्स्क-लुहान्स्क यांना स्वतंत्र राष्ट्राच्या रूपात मान्यता द्यावी, अशी रशियाची इच्छा आहे.
झेलेन्स्की यांनी अमेरिकी वाहिनीशी बोलताना सांगितले, आम्ही नाटोचे सदस्यत्व घेणार नाही. नाटो युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही. तो रशियाशी टक्कर देण्यास घाबरतो. वस्तुत: अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो आपल्या शेजारी येणे रशिया कधीही मान्य करणार नाही. आम्ही दोनेत्स्क, लुहान्स्कच्या स्थितीवर करार करण्यास तयार आहोत.
जिनपिंग यांचे पहिल्यांदाच शांततेचे आवाहन : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मंगळवारी युक्रेन आणि रशियाला संयम ठेवण्याचे आवाहन केले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन व जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज यांच्यासोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत त्यांनी युद्धाबाबत दु:ख व्यक्त केले.
झेलेन्स्की यांच्या वक्तव्यानंतर दुपारी युरोपचे बाजार दणक्यात उघडले. यात ५ टक्के तेजी दिसली. जर्मनीच्या डॅक्सने ५ टक्के, फ्रान्सच्या कॅकने ४.३६ टक्के आणि ब्रिटनच्या एफटीएसईने १.७५ टक्के वाढीवर ट्रेड केले. भारतीय शेअर बाजारही दुपारी बळकट झाला. सेन्सेक्स २.२९ टक्के वाढीने ५४,६४७ वर आणि निफ्टी २.०७ टक्क्यांनी वाढून १६,३४५ वर बंद झाला. यादरम्यान ब्रेट क्रूडही १.२२ टक्क्यांच्या घसरणीसह १२६.४ डॉलर प्रति बॅरलवर आले.
सेन्सेक्समध्ये १२२३ अंकांची वाढ; क्रूड तेलाचे दरही उतरले
मॅकडोनाल्ड, पेप्सीचाही रशियातील व्यवसाय बंद : पेप्सिको, कोकाकोलासह मॅकडोनाल्ड, स्टारबक्सनेही रशियातील ऑपरेशन्स थांबवले.
सुमीत अडकलेले ७०० भारतीय आज मायदेशी परततील : सुमीतून काढण्यात आलेले सुमारे ७०० विद्यार्थी मायदेशी रवाना होणार आहेत.