महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । जवळपास ६.२३ किलो मेट्रिक टन (सुमारे ६.२३ लाख लिटर) सूर्यफूल खाद्यतेलाचे जहाज रशियाहून भारताच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. हे जहाज बुधवारी रात्री सीरियात पोहोचले होते. आठवडाभरात ते नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर येण्याची अपेक्षा आहे. पुढील टप्प्यांत याच क्षमतेची सात जहाजे लवकरच भारताच्या दिशेने रवाना होणार आहेत. यामुळे तेलदरांचा संभाव्य भडका टळण्याची शक्यता आहे.
भारत हा जगात सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश आहे. परंतु भारताला एकूण देशांतर्गत मागणीच्या जवळपास ८० ते ८५ टक्के तेल आयात करावे लागते. त्यापैकी २२ टक्के तेल हे सूर्यफुलाचे असून ते युक्रेन व रशियाहून येते. हे सर्व तेल जहाजाने काळ्या समुद्रातून आणले जाते. रशियाने १५ फेब्रुवारीपासूनच काळ्या समुद्रात वर्चस्व निर्माण केल्याने त्यानंतर तेथून एकही जहाज रवाना झाले नव्हते. त्यानंतर युद्ध सुरू झाले. हे युद्ध अद्याप सुरू असल्याने तेलाच्या आयातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. युद्धस्थितीत खाद्यतेल आयात होत नसल्याने भारतात तेलाचे दर वाढू लागले आहेत. या स्थितीत अखेर एक जहाज रशियाहून रवाना झाल्याने ही आयात हळूहळू पूर्वपदावर येईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
‘६ लाख लिटरहून अधिक तेल असलेले हे जहाज रशियाहून निघाले आहे. एवढेच नाही तर या जहाजाने बुधवार रात्रीपर्यंत ३० टक्के अंतर कापलेदेखील आहे. तेलाचा हा साठा किमान आठ ते दहा दिवसांसाठी मुबलक असेल. यामुळे टंचाईकडे जाणाऱ्या खाद्यतेलाला आधार होईल. तसेच वाढलेले दरदेखील किंचीत कमी होऊ शकतील, असा विश्वास आहे,’ असे अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले.