महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । ‘संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनेल लागले तर हे सुरू, चॅनेल हटले तर हे बंद. मग नंतर यांचे पुन्हा कसे काय सुरू, काय चाललंय’ असे म्हणज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. मनसेचा आज 16 वा वर्धापन दिन असून, पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पुण्यामध्ये वर्धापनदिन साजरा करत आहे.
संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी रोज सकाळी पत्रकार परिषद घेत असतात, त्यावरुन राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, “चॅनेल लागले तर हे सुरू, चॅनेल हटवले तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसे काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचे पडले आहे.” असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र केले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधक म्हणतात आम्हाला संपवायला निघाले. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे मनसेचे यश आहे. या 16 वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केले त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” असे म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांचे कौतूक केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल वापरलेल्या अपशब्दांबद्दल राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. ‘तुम्हाला काही कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी….आपला काय संबंध नसताना काहीही बोलून जायचे. शिवाजी महाराजांनी कधीही सांगितले नाही की रामदास स्वामी माझे गुरू आहेत, ना रामदास स्वामींनी सांगितले शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल्यांवर टीकास्त्र केले.
एसटी कधी सुरू होणार यावर कोणी बोलत नाही, रेड टाकण्यावर बोलतात : राज ठाकरे
राज्यात गेल्या पाच महिन्यांपासून एसटी सेवा बंद आहे. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक कोणीही एसटीच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. अन् म्हणतात की आम्हाला मतदान करा. सत्ताधाऱ्यांकडे रेड टाकली की बोलायला वेळ आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या एसटीबद्दल बोलायला वेळ नाही. असे राज ठाकरे म्हणाले.