Goa Assembly Election Result 2022: गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला , मिळाली नोटापेक्षा कमी मते, समोर आली आकडेवारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १० मार्च । महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने गोव्यात भाजपाविरोधात दंड थोपटल्याने तसेच संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते गोव्यात जाऊन ठाण मांडून बसलेले असल्याने गोव्यातील निकालांकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र २०१७ प्रमाणे यावेळीही शिवसेनेच्या पदरात निराशा पडली आहे. शिवसेनेला गोव्यात यावेळी केवळ ०.२ टक्के मते मिळाली आहेत. तर शिवसेनेसोबतच गोव्यात निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही केवळ १ टक्का मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांपेक्षा गोव्यात नोटाला १.१३ टक्के मते मिळाली आहे.

गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढवली होती. तसेच शिवसेनेकडून भाजपा आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात जोरदारा आघाडी उघडण्यात आली होती. तसेच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांचीही गोव्यात मोठी प्रचारसभा झाली होती. मात्र त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आला नाही. गोव्यातील एकाही मतदारसंघात शिवसेना आणि शिवसेनेचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. तसेच शिवसेनेला एकूण मतदानापैकी केवळ ०.२ टक्के मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या खात्यात १.११ टक्के मते गेली.

दरम्यान, गोव्यामधील आतापर्यंतच्या कलांनुसार सर्वाधिक ३३.१ टक्के मते घेऊन भाजपाने १९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला २२.९ मतांसह ११ जागांवर आघाडी मिळाली आहे. मगोपला ३, आपला २, गोवा फॉरवर्डला १, रिव्होल्युशनरी गोवन्सला १ आणि अपक्षांना तीन जागांवर आघाडी मिळाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *