महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १० मार्च । जागतिक बाजारातील अनिश्चित वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने झळाळून निघाले आहे. मात्र आज गुरुवारी या तेजीला ब्रेक लागला. नफेखोरांनी उच्चांकी पातळीवर सोन्याची विक्री केल्याने सोनं ३०० रुपयांनी स्वस्त झाले. चांदीमध्ये ५५० रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजारात आज १६०० रुपयांची घसरण झाली.
सोन्याचा भाव बुधवारी ५५१३३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दोन आठवड्यात सोन्याचा भाव तब्बल ७००० रुपयांनी वाढला. मात्र ही तेजी ओसरली. आज गुरुवारी बाजार खुला होताच सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली. एमसीएक्सवर सध्या सोन्याचा भाव ५२५७९ रुपये असून त्यात २५० रुपयांची घट झाली आहे. चांदीमध्ये देखील ११५ रुपयांची घट झाली असून एक किलो चांदीचा भाव ६९५६१ रुपये इतका वाढला आहे.
आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. स्पॉट गोल्डचा भाव १९७५.६९ डॉलरपर्यंत खाली आला आहे. त्यात ०.८ टक्के घसरण झाली. आज चांदीचा भाव २५.४९ डॉलर प्रती औंस इतका आहे. त्यात १.१ टक्के घसरण झाली आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२०० रुपये इतका आहे. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५२५८० रुपये इतका आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत १७५० रुपयांची घसरण झाली आहे.
आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२०० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५२५८० रुपये इतका झाला. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९१०० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३५६० रुपये झाला आहे. त्यात १२१० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२५८० रुपये इतका आहे.