महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । रशिया-युक्रेन युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हच्या केंद्रबिंदूपासून अवघ्या 16 किलोमीटरवर पोहोचले आहे. युक्रेनियन छापामार दलासोबत रशियन सैन्याची स्ट्रीट-टू-स्ट्रीट लढाई होत असली तरी, रशियन सैन्य सध्या वरचढ ठरत आहे. कीव्हजवळ रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात एका मुलासह सात जणांचा मृत्यू झाला आहे.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पेरेमोहा गावातून महिला आणि मुलांना ग्रीन कॉरिडॉर परिसरात सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला, जो नागरिकांच्या संरक्षणासाठी रशियाच्या संमतीने बांधण्यात आला होता.
दुसरीकडे, अमेरिकेने युक्रेनला सुमारे 1500 कोटी रुपयांची अतिरिक्त शस्त्रे आणि उपकरणे देण्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने शनिवारी सांगितले की, या शस्त्रांमध्ये टँक आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. या घोषणेच्या काही तास आधी, रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने हा रशियन सैन्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही दिला. त्यांचे सैन्य शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या ताफ्याला लक्ष्य करेल, असेही सांगण्यात आले आहे.
युद्धामुळे कोरोनाची नवी लाट
या युद्धामुळे झालेल्या परिस्थितीने कोरोना महामारीची नवी लाट येण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. भारतासह संपूर्ण जग या नव्या लाटेच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे, कारण कोविड चाचणीशिवाय लोकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहे किंवा त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे.