महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन : मुंबई : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळा असं तज्ज्ञ सांगत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच ठिकाणी त्याचं पालन सुरू केलंय. बैठकांसाठी त्यांना मंत्रालय, वर्षा, महापालिका मुख्यालय असा प्रवास करावा लागतोय. कामाचा ताण वाढलेला असतानाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत या बैठकांना पोहोचत आहेत. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सुटी दिली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत आहेत.
काल (ता.३१) मुंबई महापालिकेत आढावा बैठक होती. त्यासाठी मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत बीएमसी मुख्यालयात आले. या कारमध्ये मागच्या सीटवर आदित्य ठाकरे बसले होते. सोशल डिस्टंन्सिंगचं काटेकोर पालन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे सोशल मीडियाद्वारे लोकांना घराबाहेर पडू नका, सरकार जे सांगतेय त्या नियमांचं पालन करा असं सातत्याने सांगत आहेत.
दरम्यान, देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यास सांगितलं आहे. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. मात्र लोकांनी किराणा दुकानं, भाजी बाजार, मेडिकल स्टोअर्स या ठिकाणी गर्दी किंवा झुंबड करु नये असंही आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. जे लोक लॉकडाउनचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. मात्र तशी वेळ आणू नका असंही आवाहन सरकारने केलं आहे.