१९७७ मध्येही काँग्रेस अस्ताकडे पोहोचली होती पण… : पी. चिदंबरम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सर्वच राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षही सातत्यानं बैठका घेऊन पराभवाची समीक्षा करण्याचे प्रयत्न करत आहे. नुकतीच काँग्रेस वर्किग कमिटीचीही बैठक पार पडली. यात काँग्रेसच्या पराभवाची कारणांची समीक्षा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या राजीनाम्याचा प्रस्तावही दिला होता. परंतु तो नाकारण्यात आला.

दरम्यान, या पराभवानंतर गांधी कुटुंबीयांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आपलं मत व्यक्त केलं. निवडणुकातील पराभवासाठी कोणत्याही एका व्यक्तीला जबाबदार धरण्यास त्यांनी विरोध केला आणि ही जबाबदारी सर्वांची असल्याचंही त्यांनी सांगितलं. चिदंबरम यांनी आजतकशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान, यावर भाष्य केलं.

हे पहिल्यांदाच नाही
“काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागतोय हे पहिल्यांदाच झालेलं नाही. १९७७ चा काळ मला आजही आठवतोय. त्यावेळी काँग्रेस अस्ताकडे पोहोचली होती. आम्ही आव्हानांचा सामना करतोय हे खरं आहे. आमच्या समोर आव्हानं मोठी आणि गंभीर आहेत. परंतु आम्ही त्याचा सामना करण्यासाठी तयार आहोत,” असं चिदंबरम म्हणाले.

सर्वच जबाबदार
“पराभवासाठी सर्वच जण जबाबदार आहेत. निवडणुका असलेल्या पाच राज्यांत पक्षाचे महासचिव, सचिव, इन्चार्ज यांची नेमणूक केली होती. गोव्यात मीदेखील सीनिअर ऑब्झर्व्हर होतो. भुपेश बघेल उत्तर प्रदेशचे ऑब्झर्व्हर होते. अन्य नेते अन्य राज्यांमध्ये होते. यासाठी पराभवाची जबाबदारी ही सर्वांची आहे. गोव्याची जबाबदारी मी स्वीकार करतो. माझे सोबती गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडुराव यांनीदेखील पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्वांना एकत्र मिळून याचं उत्तर शोधावं लागेल,” असंही त्यांनी सांगितलं.

“गांधी कुटुंबावर निशाणा साधणं चुकीचं”
पराभवानंतर गांधी कुटुंबावर उचलल्या जात असलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधणं चुकीचं असल्याचं म्हटलं. सोनिया गांधींनी वर्किंग कमिटीच्या बैठकीत राजीनामा देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. परंतु ऑगस्ट महिन्यात अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. आता जर नेतृत्वात बदल केले तर अन्य व्यक्तीला अंतरिम अध्यक्ष व्हावं लागेल. पण पुन्हा अंतरिम अध्यक्षांना हटवून अध्यक्ष निवडण्याचा कोणताही अर्थ नाही. सर्वांनाच पक्षाच्या निवडणुकांद्वारे पूर्णवेळ अध्यक्षाची निवड व्हावी, असंच वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *