आरपीएफने दिला ‘हा’ इशारा ; धुळवडीला रेल्वेवर फुगे माराल तर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या होळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे रुळांलगतच्या झोपड्यांमध्ये गस्त वाढवली आहे. तसेच धावत्या लोकलवर पाण्याने भरलेल्या पिशव्या आणि फुगे मारू नये, यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय फुगे, पिशव्या फेकताना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवरील मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे हद्दीतील झोपड्यांमधून धावत्या लोकलवर पिशव्या मारण्याचे प्रकार घडतात. विशेषतः महिला डब्यांना लक्ष्य केले जाते. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणारे प्रवासी जखमी होण्याची भीती असते. फुगे, पिशव्या डोळ्यावर लागल्यास डोळा निकामी होण्याच्या घटना घडतात. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढवली आहे.

धावत्या लोकलवर पिशव्या फेकणे हा गुन्हा असून असे करताना कोणी आढळल्यास त्यावर रेल्वे कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरपीएफने दिला आहे.

…येथे जनजागृती

हार्बर- मानखुर्द-चेंबूर-गोवंडी पट्टा

मध्य- कळवा-मुंब्रा पट्टा

पश्चिम- वांद्रे परिसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *