महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । पंजाब – आम आदमी पार्टीचे (AAP) नवनिर्वाचित आमदार भगवंत मान (Bhagwat Maan) हे 16 मार्च रोजी म्हणजेच आज दुपारी 12.30 वाजता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथ घेण्यासाठी त्यांनी होशियारपूर जिल्ह्यातील शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे मूळ गाव खटकड़ कलां निवडले आहे. दिल्लीप्रमाणेच (Delhi) पंजाबमध्येही (Punjab) आम आदमी पक्षाने कोणत्याही राज्यातील व्हीव्हीआयपींना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलेले नाही. त्याचवेळी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित शपथविधीसाठी खटकड़ कलां येथे पोहोचले आहेत.
भगवंत मान यांनी त्यांच्या शपथविधीसाठी ड्रेस कोड जाहीर केला आहे. यामध्ये पुरुषांनी पिवळा फेटा आणि महिलांनी पिवळी शाल/स्टोल परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतकंच नाही तर कार्यक्रमस्थळाचा पंडालही पिवळ्या रंगाने सजवण्यात आला आहे. या सोहळ्यात एक लाखाहून अधिक लोक जमण्याची शक्यता आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये AAP ला प्रचंड बहुमत मिळाले. एकूण 117 जागांपैकी 92 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या. दुसरीकडे काँग्रेसला 18, भाजपला 2, अकाली दलाला 4 आणि इतरांना एक जागा मिळाली. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान झाले होते, ज्याचा निकाल १० मार्चला जाहीर झाला. धुरी मतदारसंघातून भगवंत मान 58 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.