PAK vs AUS, 2nd Test : बाबर आजमचा विश्वविक्रम : १० तास संघर्ष करताना पाकिस्तानची लाज वाचवली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार बाबर आजम याने आज नेत्रदिपक कामगिरी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाच्या ५०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ डगमगला असताना बाबरने अब्दुल्लाह शाफिकच्या मदतीने ऑसींचा सामना केला. या दोघांनी विक्रमी २२८ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. अब्दुल्लाला शतकाने हुलकावणी दिली असली तरी बाबरने मोहम्मद रिझवानच्या मदतीने पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण, त्याचा हा संघर्ष ६०७ मिनिटांच्या खेळीनंतर संपुष्टात आला आणि पाकिस्तानची सामना ड्रॉ करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.

 

ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ५५६ धावांवर घोषित केल्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव १४८ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४०८ धावांची आघाडी घेतली. मिचेल स्टार्कने ३, मिचेल स्वेपसनने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २ बाद ९७ धावांवर डाव घोषित करून पाकिस्तानसमोर विजयासाठी ५०७ धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात इमाम-उल-हक ( १) व अझर अली ( ६) हे दोघे झटपट माघारी परतल्यानंतर अब्दुल्लाह शाफिक व कर्णधार बाबर आजम यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी २२८ धावांची भागीदारी केली. या दोघांनी जवळपास ८२ षटकं खेळून काढताना ऑस्ट्रेलियाचं टेंशन वाढवलं. पाचव्या दिवशी पॅट कमिन्सने ही भागीदारी संपुष्टात आणली. अब्दुल्लाह ३०५ चेंडूंत ९६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला फवाद आलम ( ९) हाही लगेच बाद झाला.

बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी धावांचा वेग वाढवताना पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. बाबर एकामागून एक विक्रम तोडत सुटला होता आणि तो पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून देईल असेच वाटले होते, परंतु नॅथन लियॉनने घात केला. ४२५ चेंडूं खेळपट्टीवर खिंड लढवणारा बाबर १९६ धावांवर बाद झाला. पाकिस्तानला विजयासाठी ११४ धावा हव्या असताना बाबरच्या विकेटने कराची स्टेडियमवर पुन्हा भयाण शांतता पसरली. बाबरच्या या खेळीत २१ चौकार व १ षटकार होते. १० तास तो खेळपट्टीवर संघर्ष करत राहिला. लियॉनने पुढील चेंडूवर फहीम अश्रफला ( ०) बाद करून पाकिस्तानला सहावा धक्का दिला.

कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात १९०+ धावा करणारा बाबर हा दुसरा फलंदाज ठरला. कुमार संगकाराने २००७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९२ धावा केल्या होत्या.
युनिस खान व सलीम मलिक यांच्यानंतर पाकिस्तानकडून चौथ्या डावात १५०+ धावा करणारा बाबर हा तिसरा पाकिस्तानी ठरला.
चौथ्या डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या जगातील फलंदाजांमध्ये बाबरने चौथे स्थान पटकावले. या विक्रमात इंग्लंडचे माईक अथेर्टन ( ४९२) व हर्ब सटक्लिफ ( ४६२) हे अव्वल दोन क्रमांकावर आहेत, तर भारताने सुनील गावस्कर ४४३ चेंडूंचा सामना करून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक १९६ धावा करणारा तो जगातला पहिला कर्णधार ठरला. त्याने इंग्लंडच्या मिचेल अथेर्टन यांनी १९९५ साली नोंदवलेला नाबाद १८५ धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली १४१ धावांसह ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१४) ९व्या स्थानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *