या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, पारा 43 अंशावर जाण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । वायव्य दिशेकडून येणारे उष्ण वारे निरभ्र आकाशामुळे थेट महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटेची (heat wave) शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसाच्या कालावधीत राज्यातील कमाल तपामान तब्बल 6 ते 8 अंशानी वाढलं (Temperature in maharashtra) आहे. राज्याच्या अनेक भागात सोमवारपासून लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील पाच दिवस राज्यात तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 21 मार्चपर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी सौम्य उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांत कमाल तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी तापमानापेक्षा 4.5 ते 6 अंशाने वाढलं तर उष्णतेची लाट मानली जाऊ शकते. किनारी भागात तापमानाचा पारा 37 अंशाजवळ तर पर्यंतीय भागात 30 अंश सेल्सिअसवर उष्णतेच्या लाटेची स्थिती असते. पुढील पाच दिवस कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

खरंतर, मार्च महिन्याचा हा दुसरा आठवडा आहे. अशात विदर्भातील तापमानात अचानक वाढ झाली आहे. यासोबत महाराष्ट्रातही तापमान सातत्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान 37 ते 38 अंशादरम्यान पोहचलं आहे. पुढील काही दिवसात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

असं असलं तरी राज्यात अद्याप रात्रीच्या वेळी काही ठिकाणी थंडी कायम आहे. दिवसा कडाक्याचं ऊन आणि रात्री गारठा यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्याव, तसेच दुपारच्या वेळी बाहेरची कामं टाळावीत, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यावर्षी जागतिक हवामान खात्यानं उष्ण लहरीचा धोका अधिक असण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे येणारा काळ आणि पुढील काही वर्षे अतिशय उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ चोपणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *