Indian Railway: भारतीय रेल्वेचा निराशाजनक निर्णय ; ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । भारतीय रेल्वेने(Indian Railway) प्रवास करणाऱ्या कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. कोरोना काळात रेल्वेने वयोवृद्ध प्रवाशांना देण्यात येणाऱ्या प्रवासी भाड्यावरील सूट बंद केली होती. २०२० मध्ये देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध आणले होते. काही काळानंतर रेल्वेने पुन्हा प्रवासी सेवा सुरू केल्या. परंतु ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सूट अद्याप बंद ठेवली आहे.

बुधवारी लोकसभेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) प्रवासी भाड्यात दिली जाणारी सूट अद्याप सुरू करणार नाही. त्यावर निर्बंध आहेत असं सांगितले. याचा थेट अर्थ असा की, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्याच्या दरात कुठलीही सूट मिळणार नाही. या प्रवाशांनाही इतर प्रवाशांप्रमाणे तिकीट दर द्यावे लागतील. कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध लादले होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना प्रवास करण्यावर बंदी होती. त्यामुळे रेल्वेने काही कठोर निर्णय घेतले होते. मात्र आता रेल्वे सेवा पुन्हा पुर्ववत झाली आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात देण्यात येणारी सूट बंद आहे.

परंतु रेल्वेने काही विशेष श्रेणीतील रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट दरात सूट देण्याची योजना पुन्हा सुरू केली होती. कोरोना काळात रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर तेव्हापासून ४ श्रेणीतील दिव्यांग, ११ गंभीर आजाराने त्रस्त आणि विद्यार्थ्यांना तिकीट दरात सूट देण्यात येत आहे. कोरोना काळात रेल्वे सेवा बंद असल्याने भारतीय रेल्वेला प्रचंड नुकसान झाले होते. तिकीट विक्री बंद असल्याने प्रवाशांकडून मिळणारा महसूल बंद झाला होता. त्यानंतर रेल्वे सुरू झाल्या परंतु प्रवासावरील निर्बंधामुळे प्रवासी संख्येत घट झाल्याचं दिसून आले. सध्याच्या काळात आवश्यक असेल तरच लोक रेल्वेने प्रवास करत आहेत. रेल्वेत प्रवाशांची संख्या कमी असल्याने रेल्वेला आर्थिक तोटा होत आहे.

भारतीय रेल्वेत ५८ वर्षावरील महिला प्रवासी आणि ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना तिकीट दरात सूट दिली जाते. यामुळे रेल्वेला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सूट देण्यात येणार नाही. या प्रवाशांनाही इतर प्रवाशांप्रमाणे तिकीट दर द्यावे लागतील असा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *