Maharashtra Tea Price: कटिंग महागला, चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ मार्च । सर्वसामान्यांपासून कष्टकरी वर्गाचे आवडतं पेय असणारे चहा आता दोन रुपयांनी महागणार आहे. टी कॉफी असोसिएशनच्यावतीने राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून महागाई वाढत असल्याचे दिसत होते. त्याची झळ आता सर्वसामान्यांना बसू लागली आहे. आता, दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आले आहे.

साखर, दूध, चहापावडर यांचे भाव वाढल्याने चहाचे दर ही वाढले आहेत. काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर इतकी दरवाढ करण्यात आली होती. त्याशिवाय चहासाठी आवश्यक असणाऱ्या इतर वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित जमवणं अधिक कठीण होत होते. त्यानंतर चहा विक्रेत्यांची संघटना असलेल्या टी कॉफी असोसिएशनच्यावतीने चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साधारणपणे 10 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता 12 रुपयांना मिळणार आहे.

दूध दरात वाढ

वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दूध उत्पादक महासंघ, कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर दूधामागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल, मदर डेअरी आदींनी दूधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ केली आहे.

कॉफीच्या किंमती किती वाढल्या?

कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत तीन ते चार टक्के वाढ झाली आहे. नेस्ले इंडियाच्या A+milk च्या एक लीटर वाल्या पाकिटाची किंमत चार टक्केंनी वाढली आहे. त्यामुळे या पाकिटाची किंमत 78 रुपये झाली आहे. याआधी हे पाकिट 75 रुपयांना मिळत होते. नेस्कॅफे क्लासिकच्या 25 ग्रॅम वाल्या पाकिटाची किंमत 2.5 टक्केंनी वाढून 80 रुपयांना झाली आहे. याची किंमत आधी 78 रुपये होती. नेस्कॅफे क्लासिक 50 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 145 रुपयांवरुन 150 रुपये झाली आहे.

चहा किती रुपयांना झाला?

इन्स्टंट कॉफीच्या पाकिटाची किंमत तीन ते 6.66 टक्क्यांनी वाढली आहे. त्याशिवाय ताजमहल कंपनीच्या चहाची किंमत 3.7 ते 5.8 टक्केंनी वाढली आहे. ब्रूक बॉन्डचा चहाची किंमत 1.5 ते 14 टक्केंनी वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *